वेध माझा ऑनलाइन - देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
आजकालच्या दुनियेत कोण करप्ट नाहीये? सर्वच करप्ट आहे, आजची दुनिया आणि आजकाल आमच्यावरही आरोप चाललेत, सब कुछ ओके आणि 50 खोके. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वादग्रस्त विधान केलं. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'पक्षातील लोकांना फोडणे, हे फोडाफोडीचे राजकारण राजकीय पक्षांपर्यंत ठीक आहे, त्याला विद्यार्थ्यांपर्यंत आणणं चुकीचं आहे. विद्यार्थ्यांमध्ये हे दुर्गुण यायला नको, याची दक्षता आपण घेतली पाहिजे,' असं अनिल पाटील म्हणाले.
दरम्यान कालच्या एका कार्यक्रमातही बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टोकाची टीका केली. "हु इज आदित्य ठाकरे' ? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?", अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला.
"शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत. तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात. मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे. कोण आदित्य ठाकरे? यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा?", असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला.
No comments:
Post a Comment