Sunday, September 4, 2022

पाकिस्तानमध्ये पुरामुळे हाहाकार ; आतापर्यंत 1300 लोकांचा मृत्यू

वेध माझा ऑनलाईन - पाकिस्तानमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. मुसळधार पाऊस आणि महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात आतापर्यंत एकूण 1300 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आहे. तसेच, पुरामुळे आता संक्रमणाचा धोका वाढला आहे. संक्रमणामुळे होणारे रोग पसरू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न तीव्र केले आहेत. याशिवाय, पाकिस्तानची आर्थिक स्थितीही  कोलमडली आहे. या पुरात पाकिस्तानचे 12.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर अनेक लोकांना कॅम्प आणि मदत छावण्यांमध्ये राहण्यास भाग पडले आहे. आज पाकिस्तानची परिस्थिती अशी झाली आहे की, देशाचा एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करणे हे पाकिस्तानसमोरील सर्वात मोठे आव्हान आणि गरज आहे. सिंधचा परिसर पुरामुळे प्रभावित झाला आहे. जनतेसमोर अन्न व पाण्याचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारी मदत हाच त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे.

संक्रमणाचा वाढता धोका
याचबरोबर, पुराचे पाणी जसजसे कमी होत आहे, तसतसे याठिकाणी रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये डॉक्टरांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. छावणीत राहावे लागलेले लोकही अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजारही पसरत आहेत. या आजारांचा सर्वाधिक बळी लहान मुले होत आहेत. प्रांतातील निवारा शिबिरांमध्ये किमान 47,000 गर्भवती महिला होत्या. वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे होणारे आजार रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
महापुरामुळे देशाचा एक तृतीयांश भाग बुडाला आहे आणि 33 मिलियनहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. आधीच डळमळलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला 12.5 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, महागाई दर 24 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि चालू आर्थिक वर्षात तो 30 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. याशिवाय, गरिबीआणि बेरोजगारी 21.9 टक्क्यांवरून 36 टक्क्यांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.



No comments:

Post a Comment