वेध माझा ऑनलाइन - ऑगस्टमधील महागाईचा दर भीतीदायक आहे. अनेक प्रयत्न करूनही महागाईचा दर पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. मात्र त्यात फारशी सुधारणा झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेपेक्षा जास्त महागाईचा दर समोर आला आहे. हे पाहता सप्टेंबरमध्ये पुन्हा रेपो दरात वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. आरबीआय सप्टेंबरमध्ये रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते. त्यामुळे कर्जाचे दर महागणार असून ईएमआयही वाढणार आहे, असे एका अहवालात म्हटले आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये महागाई दर 6.71 टक्के होता, तो ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. रॉयटर्सने काही अर्थशास्त्रज्ञांसह एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये ऑगस्टमध्ये महागाईचा दर 6.9 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण खरा आकडा यापेक्षा जास्त वाढून 7 टक्क्यांवर गेला. खाद्यपदार्थांच्या महागाईत वाढ झाल्याने एकूणच महागाई दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
लक्ष्यापेक्षा अधिक महागाई दर हा मॉनिटरी पॉलिसी अधिक कठोर बनवू शकतो. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत याचे परिणाम दिसून येऊ शकतात. गेल्या काही महिन्यांपासून महागाई दर वाढत आहे आणि ऑगस्टमध्येही तो वाढलाच आहे. आधीपासूनच महागाई दरावरून दबावाखाली असलेल्या एमपीसी सदस्यांवर याचा परिणाम दिसून येईल अशा तज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत
आरबीआयच्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात 2 वेळा 25-25 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ दिसून येईल. यामुळे रेपो रेट 6.40 टक्क्यांवर पोहोचेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे खाद्य पदार्थांचे दर वाढले असल्याचं आयडीएफसी फर्स्ट बँकेचं म्हणणं आहे.
No comments:
Post a Comment