वेध माझा ऑनलाइन - हलगी-घुमक्याचा कडकडाट, शिगेला पोहचलेली उत्कंठा आणि कुस्तीशौकिनांनी खचाखच भरलेल्या ओंड (ता. कराड) येथील मैदानात कोल्हापूरचा पैलवान सिकंदर शेख याने हरियानाचा पैलवान हिंदकेसरी अजय गुज्जरला एकचाक डावावर आसमान दाखवत, कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पैलवान सिकंदर शेखला रोख ४ लाख रुपयांचे इनाम बहाल करण्यात आले.
डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ओंड येथे साकारण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी स्व. पै. संजय पाटील क्रीडानगरीत कुस्तीचा महासंग्राम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धांना कुस्तीप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. खचाखच भरलेल्या मैदानात दुपारच्या सुमारास सुरू झालेले कुस्ती सामने, रात्री उशिरापर्यंत सुरू होते आणि कुस्तीप्रेमी राज्यभरातून आलेल्या मल्लांच्या चटकदार कुस्त्यांचा मनमुराद आनंद लुटत होते.
कुस्ती महासंग्रामाचे उद्घाटन कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दत्तात्रय देसाई, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतिक्षा बागडी, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, उपहाराष्ट्र केसरी पैलवान दादासाहेब थोरात, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नजरुद्दीन नायकवडी, पैलवान जालिंदर मुंडे, पैलवान भगवानराव पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, रामकृष्ण वेताळ, शिवाजीराव थोरात, सर्जेराव थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील व पुण्याचा पैलवान माऊली कोकाटे यांच्यात झालेली द्वितीय क्रमांकाची लढत अतिशय तुल्यबळ होती. पण लवकर निकाल न लागल्याने कुस्तीशौकीनांच्या मागणीनुसार ही लढत अखेरीस बरोबरीत सोडविण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर याने हरियानाचा मल्ल सोनू गुज्जर याला एकचाक डावावर चितपट करत, दीड लाख रुपयांचे इनाम पटकाविले.
इतर प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये कोल्हापूरचा पैलवान हसन पटेल याने पुण्याच्या पैलवान पोपट घोडके याला हफ्ते डावावर मात दिली. हरियानाचा राष्ट्रीय विजेता पैलवान मोनू गुज्जर याने पुण्याचा पैलवान कौतुक ढाफळे याला; तर साताऱ्याचा पैलवान विकास सूळ याने सांगलीचा पैलवान प्रशांत शिंदे याला पराभूत केले. तसेच ओंडचा पैलवान विकी थोरात व सांगलीचा पैलवान प्रदीप ठाकूर यांच्यात दीर्घकाळ लढत झाली. अखेर ही लढत बरोबरीत सुटली. याशिवाय प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणार्याच दोनशेहून अधिक लहान-मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या.
भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, पैलवान सचिन बागट, पैलवान प्रवीण थोरात, पैलवान प्रदीप धोत्रे यांनी मैदानाचे संयोजन केले. पैलवान बंडा पाटील-रेठरेकर, पैलवान संपत जाधव, पैलवान हणमंत पाटील-पुणदीकर, पैलवान विकास पाटील-बोरगावकर, वारणेचे वस्ताद पैलवान संदीप पाटील, पैलवान आनंदराव धुमाळ, पैलवान प्रवीण थोरात, पैलवान राहुल मोरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. पैलवान ईश्वरा पाटील, पैलवान युवराज केचे यांनी कुस्तीचे निवेदन केले.
माऊली जमदाडे ‘कृष्णा केसरी’चा मानकरी
मानाची चांदीची गदा असणाऱ्या ‘कृष्णा केसरी’ किताबासाठी कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे व पुण्याचा पैलवान अक्षय शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. बराच वेळ कुस्ती चालल्यानंतर पंचांनी माऊली जमदाडेला गुणांवर विजयी घोषित केले. पैलवान जमदाडे याने मानाच्या ‘कृष्णा केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. त्याला डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देण्यात आली.
कुस्ती परंपरेला मिळाली चालना
डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला चालना मिळाली आहे. देश व राज्यातील नामांकीत पैलवानांच्या सहभागामुळे कुस्तीशौकीनांना अनेक चटकदार कुस्त्यांच आनंद लुटता आला. याबद्दल कराड तालुका कुस्ती संघटना आणि महाराष्ट्र केसरी पैलवान संजप पाटील युवा प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ओंड ग्रामस्थांच्यावतीनेही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कुस्ती शौकीनांची प्रचंड गर्दी
महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख, हिदंकेसरी पैलवान अजय गुज्जर, महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील, पैलवान माऊली जमदाडे आदी नामवंत मल्लांचे आखाड्यावर आगमन होतात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडात करत त्यांचे जंगी स्वागत केले. ओंड येथे खास तयार केलेल्या मैदानावर कुस्तीशौकीनांनी मोठी गर्दी केली होत. कुस्ती सुरू असताना डाव व प्रतिडाव यालाही प्रेक्षक टाळ्या वाजवून दाद देत होते.
No comments:
Post a Comment