वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यभर वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे कराड येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
कराड येथील दत्त चौक, आझाद चौक, मंडई मार्गे ही यात्रा यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे पोहचली. 'मी सावरकर' अशा टोप्या घातलेले युवक व महिला कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. याठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते आणि गौरव यात्रेचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भाजपचा ४३ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी झालेल्या सभेत बोलताना डॉ. भोसले म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. इंग्रजांच्या राजवटीत देशातील लोकांवर कसा अन्याय होतोय, हे सावरकरांनी आपल्या साहित्यातून मांडले आहे. त्यांच्या साहित्यावर इंग्रजांनी बंदी आणली, पण सावरकर डगमगले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रसंगी परदेशातूनही लढा उभारला. देशात हिंदुत्ववादी विचार रुजविण्यासाठी त्यांनी आपले अखंड आयुष्य अर्पिले. अशा स्वातंत्र्यवीरांचा अपमान होत असताना, संपूर्ण देश त्यांच्या विचारांसोबत आहे हे दाखविण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल चुकीची विधाने करून स्वतःची उंची कमी करून घेतली आहे.
विक्रम पावसकर म्हणाले, भारत हिंदूराष्ट्र व्हावे तसेच हिंदू जातीतील सर्व समाज हिंदू म्हणून एकत्र यावेत हा प्रयत्न वीर सावरकर करत होते. भविष्यात आपण त्यांच्या विचाराने चाललो नाही तर या देशात अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही. जवळपास ते ८३ वर्षे जगले, पण शेवटपर्यंत त्यांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. भविष्यात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायचा झाल्यास २०२४ ला भाजपालाच पुन्हा पूर्ण ताकदीनिशी निवडून आणण्याची गरज आहे.
यावेळी योगेश सोमण लिखित 'वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद' या नाटकाचे अभिवाचन नरेंद्र आमले व उमेश घळसाशी यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, सुदर्शन पाटसकर, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, शैलेंद्र गोंदकर, विश्वनाथ उटाणे, सौरभ शहा, अण्णासो काशीद यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment