वेध माझा ऑनलाइन - ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. काय होतास तू, काय झालास तू, असा कसा वाया गेलास तू? उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणतात, मात्र मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
तुम्ही ठाकरे परिवारातील सदस्याला काय म्हणालात, कोणत्या शब्दात बोललात, ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. ईडी, सीबीआय भाजपाचे बॉडीगार्ड आहे. ईडी, सीबीआय बाजूला ठेवा, मग काडतूसचा अर्थ सांगतो, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तसेच तुमचं काडतूस भिजलेलं आहे, ते उडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. तुम्ही झुकेगा नही, म्हणताय, मात्र तुम्ही झुकलेलेच आहात. शिंदेसोबत काम करायला लागणं म्हणजे झुकणचं आहे. ज्याला नीट वाचता येत नाही, अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करताय, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
महिला गुंडांचीही गँग तयार होतेय- उद्धव ठाकरे
राज्यात गुंडगिरीचे राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री म्हणायचे हे लोक ठरवतील. त्यांनी गुंडमंत्री असे पद निर्माण करून गुंड पोसण्याचे काम त्या मंत्र्याकडे द्यावे. ठाण्यात आता महिला गुंडांचीही गँग तयार होऊ लागली आहे. आम्ही आमच्यावरील संस्कारामुळे शांत आहोत, पण जर ठरविले तर एका क्षणात ठाणेच काय तर महाराष्ट्रातील गुंडगिरी उपटून काढू शकतो, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. यापूर्वी भाजपच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या नेत्यांनी मारहाण केली तेव्हाही ठोस कारवाई झाली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment