वेध माझा ऑनलाइन -
शरद पवारांच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंनी नवा प्रस्ताव ठेवला आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना मोठी ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 11 एप्रिलला सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या तीनही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच ही भेट झाली, त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत शिवसेनेकडून गौप्यस्फोट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे, शरद पवारांना भेटून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या कोणालाही मुख्यमंत्री बनवा, आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव ठाकरेंनी शरद पवारांना दिला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावाही म्हस्के यांनी केला आहे.उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना भेटून आपला मुख्यमंत्री पदाचा दावा मागे घेतलाय. ज्या मुख्यमंत्रीपदाकरता उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पद घेतले, ते मुख्यमंत्री पदही गेले. तेल ही गेले तुप ही गेले, हाती आले धोपाटणे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.
दरम्यान अजित पवार नाराज असून ते लवकरच राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चा सुरू असतानाच ठाकरे आणि संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनीही शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी फोडण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, असे संकेत दिले.दुसरीकडे अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं सांगत संजय राऊतांना टोला लगावला. राष्ट्रवादीबद्दल बोलण्यासाठी आमचे नेते आणि प्रवक्ते खंबीर आहेत, दुसऱ्या कोणी आमची वकिली करू नये, असा निशाणा अजितदादांनी राऊतांवर साधला होता.
No comments:
Post a Comment