Thursday, April 13, 2023

आमदार सतेज पाटील यांच्यावर काँग्रेसकडून आणखी एक जबाबदारी

वेध माझा ऑनलाइन - राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे विधानपरिषदेमधील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पक्षाकडून आणखी एक जबाबदारी मिळाली आहे. राज्यात होणाऱ्या आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या राज्य निवडणूक समन्वय समितीवर सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पाटील यांचा 51 वा वाढदिवस काल 12 एप्रिल रोजी दणक्यात साजरा करण्यात आला. याचदिवशी त्यांना पक्षाकडून आणखी एक संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.  
निवडणूक समितीमध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण 17 सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. अन्य सदस्यांमध्ये बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. तसेच नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.
यापूर्वी, आमदार सतेज पाटील यांची विधानपरिषदेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणारे सतेज पाटील काँग्रेसचा चेहरा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे.  भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी पहिली जाहीर सभा कोल्हापुरात त्यांच्याच नेतृत्वात पार पडली होती. सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. आघाडी सरकारमध्ये 2010 ते 14 या कालावधीत त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, अन्न आणि औषध प्रशासन अशा विविध विभागांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.






No comments:

Post a Comment