वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातबारा उताऱ्यापासून ते तलाठ्याची सही आणि शिक्का बोगस बनवून कागदपत्रे खरी असल्याचे भासवून तब्बल 1 कोटीहून अधिक रकमेचं नामांकित बँकेतून कर्ज काढत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी 49 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील कुडाळ येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार गणेश भगत (रा. कुडाळा, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांनी बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळच्या शाखेत कर्ज घेताना बोगस सातबारा उतारे तयार केले. त्यावर तलाठ्याची खोटी सही व शिक्का मारून हे उतारे खरे आहेत असे भासवले. कागदपत्रावरून बॅंकेने प्रत्येकाला कर्ज दिले. मात्र, त्यांनी दिलेल्या कर्जाची परफेड केली नाही. त्यावेळी बॅंकेने या सर्वांच्या कादपत्रांची पुन्हा शहानिशा केली असता सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले.हि गोष्ट लक्षात आल्यानंतर बॅंकेच्या वतीने मेढा येथील न्यायालयात फाैजदारी खटला दाखल करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या सर्वांनी मिळून तब्बल 1 कोटीहून अधिक रक्कम कर्ज घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आता गुन्हा दाखल झाला असून 49 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment