वेध माझा ऑनलाइन।
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. आताही त्यांनी राजकीय नेत्यांना महाभारतातील पात्रांची नावे देताना शरद पवारांचा उल्लेख शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानवीर आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत असेही सदाभाऊ खोत यांनी म्हंटल. भाजप नेते सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सांगलीत एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सदाभाऊंनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, महायुतीची सत्ता आली होती. पण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा. शकुनी मामानं डाव टाकला आणि जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं गेलं. पण त्यांना ते राज्य फार काळ लाभलं नाही. एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत ते मागेल त्याला दान करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात अर्जुनाची भूमिका बजावत आहेत, राज्य कस चालवायचं ते त्यांना माहित आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टीपणा आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणावरूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आत्तापर्यंत अनेक वेळा मराठा समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला. परंतु यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. पण 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण मिळवून दिले. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी हे आरक्षण घालवले. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. शरद पवारांना कळलं की एकच माणूस आपल्याला छातीवर घेऊ शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून फडणवीस यांच्याविरोधात सगळे एक झाले असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
No comments:
Post a Comment