Sunday, August 11, 2024

ठाकरे गटाचा मेळावा संपला आणि ठाकरे गटाच्या वाघिणीचा शिंदे गटात प्रवेश झाला ; कोण आहेत त्या नेत्या ? काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाईन।
ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिर्जे यांनी आनंदआश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पाडला. या मेळाव्यात मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले. त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. आता हा मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

एकनाथ शिंदेंकडून स्वागत
ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा संपताच अनिता बिर्जे यांनी आनंदआश्रमात येऊन शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली होती.

ठाकरे गट सोडण्यामागचे कारण
अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्यामागचे कारण सांगितले. एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

No comments:

Post a Comment