Sunday, August 18, 2024

लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु ठेवणार ; दीड हजार रुपयांची रक्कम वाढत जावून तीन हजार रुपयांपर्यंत करणार ;

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली. सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. त्यामुळे, लाडक्या बहि‍णींना आणखी एक गुडन्यूज मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील.  राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढत जावून टप्या-टप्यापर्यंत तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही यावेळी शिंदेंनी सांगितले. माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हांला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहीणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत राज्यात 1 कोटी बहिणींच्या खात्यात 3 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.  शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकत द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलाना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे, असेही शिंदेनी म्हटले.

No comments:

Post a Comment