Thursday, August 22, 2024

बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार : डॉ. अतुल भोसले ; कराड दक्षिणमधील १,०६१ जणांना गृहपयोगी साहित्याचे वितरण; महिलांची प्रचंड गर्दी

वेध माझा ऑनलाईन ।
कराड दक्षिणमधील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. बांधकाम कामगारांपर्यंत या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर प्रयत्न करावेत. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. पाचवड फाटा येथील आनंद मल्टिपर्पज हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत गृहपयोगी साहित्य, सुरक्षा संच पेटीचे वितरण केले जाते. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील १,०६१ जणांना गृहपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पात्र बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे धनादेशही डॉ. भोसले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे गोरगरीब कामगारांना मोठा लाभ मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून केवळ भांडी उपलब्ध केली जात नसून, पात्र लाभार्थ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे. याशिवाय बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत औषधोपचार उपलब्ध होणार असून, कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी अधिकाधिक पात्र बांधकाम कामगारांनी नावनोंदणी करुन, याचा लाभ घ्यावा. 

याप्रसंगी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी श्री. शेख साहेब, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, माजी जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, डॉ. सारिका गावडे, वर्षा सोनवणे, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी, तालुकाध्यक्ष रुपेश देसाई, योगेश पाटील, सागर पाटील, विकास साळुंखे, पल्लवी पवार, सुरेखा माने, रविराज देसाई, तनुजा धुमाळ यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment