Sunday, August 11, 2024

भुजबळ आक्रमक ; म्हणाले...सगळे मराठे वाईट नाहीत, पण जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला सोडू नका;

वेध माझा ऑनलाईन।
मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांची मागणी मान्य होणं शक्य नाही, सगळ्यांनाच कुणबी व्हायचं आहे मग राज्यात मराठा शिल्लक राहील का असा सवाल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना विचारला. सगळेच मराठे वाईट नाहीत, पण ओबीसींच्या अंगावर येणाऱ्यांना सोडू नका असं आवाहन छगन भुजबळांनी केलं आहे. सांगलीत ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यात ते बोलत होते. 

आठ आमदार निवडून आणून दाखव
ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना पुन्हा थेट आव्हान दिलं. राज्यात 288 जागांवर उमेदवार उभे करू असं ते म्हणतात, अरे 88 जागा लढवून दाखव आणि त्यातले 8 निवडून आणून दाखव असं आव्हान भुजबळांनी मनोज जरांगे यांना दिलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही, सगेसोयऱ्यांना देखील आरक्षण देता येणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं असं देखील ते म्हणाले. 

सांगलीचे वसंतदादा कुठे आणि आता त्याचे वारसदार कुठे असं म्हणत भुजबळांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. तसेच मनोज जरांगे म्हणजे नवीन नेता असा उल्लेखही त्यांनी केला. आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नसून सामाजिक मागासलेपणावर आहे, हे त्याला कसं समजणार असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. 

मराठा शिल्लक राहील का? 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. आज गावागावात ओबीसींवर हल्ले होत आहेत. आरक्षण कायद्यानुसार द्या ही आमची भूमिका आहे. आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्वांनाच कुणबी व्हायचं आहे तर मग मराठा शिल्लक राहील का? 

राज्यात 54 टक्के ओबीसी आहेत हे जरांगे विसरतात. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तसंच सग्यासोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही असं छगन भुजबळांनी म्हटलंय.

सगळे मराठे वाईट नाहीत, पण जो ओबीसीच्या आरक्षणावर उठेल त्याला मात्र सोडू नका असं भुजबळांनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment