Sunday, August 11, 2024

काही महिन्यांत कराड विमानतळ सुरू होऊन विमान उड्डाण घेईल ; केन्ट्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कराडात प्रतिपादन ;

वेध माझा ऑनलाईन कराडच्या विमानतळ विस्तारवाढीसाठी तब्बल 48 हेक्टर जागेचे भूसंपादन करायचे आहे. त्यापैकी 38 हेक्टर जागेचे संपादन असून उर्वरित दहा हेक्टर बाकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या 10-15 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून भूसंपादन झाल्यावर पुढची कार्यवाही होऊन काही महिन्यांत कराड विमानतळ सुरू होऊन विमान उड्डाण घेईल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.  यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजप नेते मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर,शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री मोहोळ म्हणाले, विमानतळ विस्तारवाढीसाठी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून जमीन हस्तांतरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कराड विमानतळ झाल्यास पश्चिम महाराष्ट्रासह सातारा व सांगली जिल्ह्याची चांगली सोय होईल. याठिकाणी एअर स्ट्रीप वाढेल. तसेच किमान 70 प्रवासी असलेले विमान उड्डाण  घेऊ शकेल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले, मनोज जरांगे-पाटील हे राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने करीत आहेत, यात काहीही चुकीचे नाही. 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका घेतली. तसा निर्णय घेऊन दहा टक्के आरक्षणही दिले. ते पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही टिकले. 

भाजपच्या अधिवेशनाबाबत ते म्हणाले, राज्यभरात भाजपच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय अधिवेशनने घेतली जात आहेत. त्यानुसार सर्व नेते वेगवेगळ्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी, तसेच विधानसभेची तयारी म्हणूनही प्रयत्न करत आहेत. त्याच्या दृष्टीने कराडचेही अधिवेशन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण हे देशाचे मोठे नेते होते. त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले. कराडला आल्यानंतर त्यांच्या स्मृती नक्कीच जागृत होतात. त्यामुळे सदर अधिवेशनासंदर्भात कराड ला आल्यानंतर प्रथमत: चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्याचे मंत्री मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment