वेध माझा ऑनलाईन - पंकजा मुंडे या मागच्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे. पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक चुकीची वागणूक दिली जात आहे, जाणूनबुजून काही लोक हे काम करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याबद्दल कारवाई करायला भाजप जिल्हाध्यक्षांना सांगितल्याचंही बावनकुळे म्हणाले.
'असा व्हिडिओ एटिड करणे आणि प्रकाशित करणं हे काही योग्य नाही. पंकजा ताईंना जाणीवपूर्वक भाजपचे नेते चुकीची वागणूक देतात. जाणूनबुजून काही लोक काम करत आहेत. कालच्या व्हिडिओवर मी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमचे पदाधिकारी तिकडे जातील आणि ज्यांनी हे केलं त्याला शोधून काढतील. पोलीस शोधून काढतील', अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
'पंकजा ताई आमच्या नेत्या आहेत, पंकजा ताईंनी घेतलेल्या भूमिकेला प्रत्येकवेळी आमचं समर्थन आहे. पंकजा मुंडेंच्या संघटनात्मक कामाला आमचं पाठबळ आहे. राज्यातला कोणीही नेता पंकजा ताईंच्या आडवा येत नाही. देवेंद्रजी असोत मी असेन नितीनजी असतील, आम्ही सगळे पंकजा मुंडेंना मदत करणारे आहोत', असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं.
'पंकजा मुंडे आणि मी 16 तास प्रवास केला. काही लोक जाणीवपूर्वक त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तयार करून त्यांना वादात आणतात. त्या मोठ्या नेत्या आहेत त्यामुळे मी अध्यक्ष असूनही त्यांना काल शेवटी भाषण करायला सांगितलं, त्याचा व्हिडिओही माध्यमांना पाठवण्यात आला. या विकृती आहेत', अशी टीका बावनकुळेंनी केली.
'पंकजाताईंच्या कामात कुणीही हस्तक्षेप केलेला नाही, आणि कोणीही हस्तक्षेप करणार नाही. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही', असा विश्वास बावनकुळे यांनी दिला.
No comments:
Post a Comment