Friday, September 29, 2023

कराडात रणजित नानांच्या दातृत्वाचे कौतुक ; सुमारे 52 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ ; रणजितनाना पाटील मित्र परिवाराने गणपती विसर्जनादिवशी राबवला महाप्रसाद वाटपाचा उपक्रम :

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने सलग नवव्या वर्षी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी प्रीतिसंगमावर येणाऱया भाविक व सार्वजनिक मंडळांना श्रमपरिहार (महाप्रसाद) देण्यात आला. सकाळी अकरापासून रात्री तीनपर्यंत अव्याहत सुरू असलेल्या या उपक्रमात सुमारे 52 हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  

अनंत चतुर्दशीला शहर व परिसरातील भाविक व सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कृष्णा घाटावर होत असते. या भाविक व कार्यकर्त्यांना श्रमपरिहार म्हणून महाप्रसाद देण्याचा उपक्रम रणजितनाना पाटील यांनी 2015 साली सुरू केला. यावर्षीही मोठी तयारी करण्यात आली होती. महाप्रसादाबरोबर पाणी बॉटलही  देण्यात येत होती. गेल्या वर्षी सुमारे 40 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी हा आकडा सुमारे 52 हजारांपर्यंत पोहोचला. पहाटे तीनपर्यंत मंडळांचे कार्यकर्ते याचा लाभ घेत होते. दिवसभरात विसर्जनासाठी आलेले नागरिक, भाविक, महिला, मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांनी याचा लाभ घेतला. महाप्रसाद देण्याबरोबरच अन्न पाकिटेही देण्यात येत होती.  

खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार व भाजपचे पदाधिकारी यांनी उपक्रमास भेट दिली.  

या उपक्रमात स्वच्छतेची काळजी घेण्यात आली. 25 महिला स्वच्छतेसाठी कार्यरत होत्या. जागीच जेवण बनवण्याचे काम दिवसरात्र सुरू होते. वाढपी, रणजितनाना पाटील मित्रपरिवारातील कार्यकर्ते असे सुमारे 300 जणांचे पथक हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते.

भाविकांकडून कौतुक
रणजितनाना पाटील गेली 9 वर्षे हा उपक्रम आयोजित करत आहेत. गणेश विसर्जनानंतर मोफत श्रमपरिहाराची सोय असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील लोक आवर्जुन याचा लाभ घेत होते. त्यांना पाणी बॉटलही देण्यात येत होती. एकूण या उपक्रमातील जय्यत तयारी पासून भाविकांनी रणजितनाना पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment