Thursday, September 21, 2023

अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, पडळकरांच्या विधानावर भाजपाकडून जाहीर माफी...!

वेध माझा ऑनलाईन। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशा आशयाचं विधान पडळकरांनी केलं. पडळकरांच्या या विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून अजित पवार गटातील नेते आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकरांच्या विधानाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे. अजित पवारांनी मोठ्या मनाने पडळकरांना माफ करावं, असंही बावनकुळे म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अजित पवारांविरोधात गोपीचंद पडळकरांनी केलेलं वक्तव्य संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधीही याचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. एखाद्याशी आपलं पटत नसेल किंवा महायुतीत असून आपले विचार वेगळे असतील. तुमचे मतभेद असतील. पण मनभेद तयार करून व्यक्तीगत टीका-टिप्पणी करणं, हे राज्याच्या संस्कृतीला धरून नाही. भाजपाच्या संस्कृतीलाही शोभणारं नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे अजित पवारांबद्दल जे काही बोलले, त्याबद्दल मीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो.”

“आपलं कितीही वैर असलं तरी पडळकरांसारखं कुणीही कुठल्याही नेत्यांबाबत बोलू नये. कितीही मतभेद असले तरी सार्वजनिकपणे कुणाचा अपमान करणे, आपल्या रक्तात नाही. विरोधी पक्ष असला तरी त्यांच्यावर संस्कारमय पद्धतीने टीका करायला हवी. पक्षीय राजकारणात टीका केली जाऊ शकते. पण व्यक्तीगत टीका केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पडळकर जे काही बोलले आहेत, त्यांना अजित पवारांना मोठ्या मनाने माफ करावं. मीही अजित पवारांना याबद्दल बोलणार आहे,” असंही बावनकुळे म्हणाले

No comments:

Post a Comment