वेध माझा ऑनलाइन। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘लांडग्याचं पिल्लू’ म्हणत टीका केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील पडळकर आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान याबाबत माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली आहे. त्यावेळी फडणवीसांनी पडळकर यांचे कान टोचले आहेत. सुप्रिया सुळे यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, यासाठीच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं का? असा थेट सवाल केला आहे. तसेच हा अजित पवारांचा मोठा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुर्दैव एका गोष्टीचं मला वाटतं, अजित दादा हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, विशेष म्हणजे ते आज भाजपसोबत सत्तेत आहेत. तरीही त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असं बोलत आहे. भाजपने याचे उत्तर दिले पाहिजे, तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने अजित पवारांना सत्तेत सोबत घेतलं. मग ते अजित पवारांचा अपमान करण्यासाठी घेतले का? असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. ही कुठली पद्धत आहे, स्वत:च्या सहकारी पक्षनेतृत्त्वाबद्दल बोलायची, हे दुर्दैवी असून अजित पवारांचा अपमान आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
No comments:
Post a Comment