Sunday, September 17, 2023

खंबाटकी घाटात दुचाकी ट्रक खाली सापडून युवक-युवती जागीच ठार ; वाहतूक कोंडीमुळे रविवारी दिवसभरात एकूण 4 अपघाताची नोंद !

वेध माझा ऑनलाइन। पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात दुचाकी ट्रक खाली सापडून युवक-युवती जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यामुळे साताऱ्याकडे येणारी वाहतूक शिरवळ, लोणंदमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम होऊन इंजिन गरम झाल्याने सुमारे 30 गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहतूक कोंडीत रविवारी दिवसभरात अपघाताच्या एकूण 4 घटनाही घडल्या आहे

गणेशोत्सवामुळे सलग दुसऱ्या दिवशी कात्रज आणि खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या सुमारे 30 गाड्या इंजिन गरम झाल्यामुळे बंद पडल्या. तसेच एस कॉर्नरवर पाच गाड्या एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले. खेड शिवापुर आनेवाडी येथील टोल नाक्यांवर देखील वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत होत्या.
गणेशोत्सवासाठी पुण्या-मुंबईवरून चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस पुणे-सातारा दरम्यान महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रविवारी सकाळपासून कात्रजपासून खेड शिवापुर, वेळे-कामथी ते आनेवाडी टोल नाका दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी होती.
रविवारी दिवसभरात सातारा जिल्ह्याच्या हद्दीत एकूण चार अपघात झाले आहेत. त्यातील एका अपघातात दुचाकीवरील युवक आणि युवती जागीच ठार झाली. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. अपघाताची माहिती मिळतात भुईंज आणि खंडाळा वाहतूक मदत केंद्राचे पोलीस तसेच शिरवळ रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
महामार्गावरील एस कॉर्नरवर पाच गाड्या एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी झालेल्या अपघातांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. गावी निघालेल्या चाकरमान्यांना अनेक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. त्यामुळे दिवसभर महामार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू होती.

No comments:

Post a Comment