वेध माझा ऑनलाइन। काही महिन्यापूर्वी टोमॅटोला सोन्याचा भाव आलेला होता. बाजारात टोमॅटो २०० रुपये किलोने विकला जायचा, सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली. पण टोमॅटोचे उत्पादन घसरल्याने सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दीडशे ते दोनशे रुपये किलोनं विक्री होणारा टोमॅटो सध्या आठ ते दहा रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत.
याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. या पार्श्वभूमीवर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला जातोय. देशात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर सरकारनं किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली. सरकारनं नेपाळहून टोमॅटोची आयात केली. परिणामी टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
दरात घसरण झाल्याचा सर्वाधिक परिणाम हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात दिसून आला आहे. कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान टोमॅटोचे बंपर उत्पादन अपेक्षित आहे. अशा स्थितीत सप्टेंबर २०२३ मध्ये टोमॅटोचे उत्पादन ९.५६ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. तर ऑक्टोबरमध्ये ते १३ लाख टन अपेक्षित आहे. अशा स्थितीत जास्त उत्पादन झाल्यास टोमॅटोचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
ग्राहक आणि अन्न व्यवहार विभाग शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध राज्यांमधून १० ते २० कोटी रुपयांचे टोमॅटो खरेदी करण्याची शक्यता आहे. टोमॅटोच्या घसरलेल्या किमतींबद्दल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव झपाट्याने कमी झाल्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. पिकाचा उत्पादन खर्चही निघणं अवघड झालं आहे. अशा स्थितीत सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी टोमॅटो खरेदी करण्याची शक्यता आहे.
आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारनं नाफेडमार्फत ५० रुपये किलो दरानं टोमॅटोची खरेदी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. सरकारनं टोमॅटोची खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे स्वाभिमानीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment