वेध माझा ऑनलाइन। मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव काही कठोर नियम करण्यात आले आहेत. या नियमावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. आता मंत्रालयात येणाऱ्या जिथे जायचे आहे त्याच मजल्यावरचा पास दिला जाईल. त्यासाठी विशिष्ट रंगाचा पास असेल. या नियमावरूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी घणाघाती टीका केलीय. असा आदेश काढणाऱ्या नोकरशाहीचा ‘वरचा मजला’ रिकामा आहे काय? असा थेट सवाल शेजवळकर यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आलेल्या एक युवकाने शिक्षक भरतीसाठी जाळीवर उडी मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. असे प्रकार वारंवार घडत असल्याने सरकारने लगेचच मंत्रालयाची सुरक्षा कडक करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तातडीने काही नियम बनवण्यात आले. या नियमांमध्ये भेटीसाठी आलेल्यांना ज्या मजल्यावर जायचे आहे त्याच मजल्याचा पास दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. एवढेच नाही तर प्रत्येक मजल्यासाठी रंग ठरवला जाईल आणि त्याच रंगाचा पास अभ्यागतांना दिला जाईल. म्हणजे ही मंडळी मंत्रालयात भटकत राहणार नाहीत.
पण ज्यांना अनेक विभागांमध्ये कामे आहेत, त्यांनी काय करायचे याबाबत नियमांमध्ये काहीही स्पष्टता नाही. मंत्रालयात येणारे अनेकवेळा तीन-चार खात्यांची कामे घेऊन येतात. संबंधित खात्यांची कार्यालये एकाच मजल्यावर असण्याची शक्यताही नाही. अशा लोकांची खूप गैरसोय होणार आहे. त्यांना एका विभागाचे काम झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या मजल्यावरील विभागाचा पुन्हा पास काढावा लागेल. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी वेळखाऊ आणि किचकट ठरू शकते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशी मंडळी मंत्रालयात रोज येत असतात. सुरक्षेच्या नव्या नियमामुळे गरजू लोकांची खूप अडचण होणार आहे. म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून मंत्रालयातील नोकरशाहीवर सडकून टीका केली आहे.
No comments:
Post a Comment