Wednesday, September 20, 2023

वेगळी बातमी ; शर्टची बटणं खुली ठेवली म्हणून चौघांविरोधात गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन। अनेकांना शर्ट घातल्यानंतर पहिली दोन-चार बटणं लावल्यानंतर अवघडल्यासारखं वाटतं. काहीजण शर्टची सवय नसल्यानेदेखील पहिली दोन-चार बटणं लावत नाही. तर, काही जणा निव्वळ शायनिंग मारण्यासाठी म्हणा अथवा भाईगिरी दाखवण्यासाठी शर्टची बटणं खुली ठेवतात. शर्टाच्या गुंड्या मोकळ्या ठेवणे हे चार जणांना जरा महागात पडलं आहे. नांदेडमधील लोहा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे चारही जण पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यावेळी असभ्य वर्तन म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोहा पोलिसांनी केलेल्या कारवाईची सध्या नांदेड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. गुन्हा दाखल झालेले चौघेजण हे कामानिमित्त आणि पोलिसांनी बोलावले म्हणून आले होते. मात्र, या चारजणांच्या शर्टाच्या गुंड्या मोकळ्या होत्या आणि मोठ्या आवाजाने बोलत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. ध्यानीमनी नसताना अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने या चौघांनाही धक्का बसला आहे. 

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचालकर यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन हे सार्वजनिक आणि शिस्तीचे ठिकाण आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस स्टेशनला कोणत्याही कामासाठी गेला असाल तरी वर्तवणूक ही चांगली, सभ्य असावी. आवाजही कमी असावा, अन्यथा मुंबई पोलीस कायदातंर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment