Friday, September 15, 2023

ऐन गणपती आगमनाच्या काळात राज्यात पावसाची शक्‍यता ; मुंबई प्रादेशिक हवामान खात्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात दुष्काळप्रवण स्थिती निर्माण झालेली असताना ऐन गणपती आगमनाच्या काळात राज्यात पावसाची शक्‍यता आहे. १९ सप्टेंबरला गणपती बाप्पांच्या आगमनासोबतच पाऊस देखील सक्रिय होईल, अशी आनंदवार्ता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारली. राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याचे संकट उभे राहिले आहे. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ही जोर धरू लागली आहे. धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नसल्यानं कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतात पेरणा झाल्यानंतर पावसात मोठा खंड पडल्याने पिके करपली. राज्यातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या शनिवारपासून मुंबई, ठाण्यात पावसाने जोर पकडला आहे. राज्यातील इतर भागात केवळ ढगाळ वातावरण दिसून येत असताना, येत्या पंधरा तारखेपासून राज्यात आठवडाभर पावसाचा मुक्काम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे

गणपतीच्या आगमनाच्या दोन-चार दिवस अगोदरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येत्या दिवसात बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. भाड्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा यांच्या संमिश्रणातून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. १५ आणि २३ सप्टेंबर दरम्यान राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तरीही राज्यातील दुष्काळजन्य स्थिती या दिवसांच्या पावसाने तारली जाईल, याची फारच कमी शक्यता आहे याच दरम्यान बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दोन्ही स्थिती निर्माण झाल्यानंतर संपूर्ण कोकण, नाशिक,कोल्हापूर आणि सह्याद्रीचा घाटमाथाचा परिसरात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने माध्यमांना दिली आहे .

No comments:

Post a Comment