वेध माझा ऑनलाइन। एखाद्याला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होवू नये, ही माझी भूमिका आहे. दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मी मुख्यमंत्री असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. आरक्षणातून आर्थिकता उंचावेल, ही शक्यता तितकी यशस्वी होणार नाही. त्यामुळे जातीच्या आधारावर जनगणना व्हावी. त्यातून प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. जातवार जनगणना झाली पाहिजे, व वास्तव पुढे आले पाहिजे. असा काँग्रेसचा आग्रह आहे. पण हे मोदींना मान्य नाही. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कार्वे (ता. कराड) येथे राज्यस्तरीय माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माळी यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कोयना सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष बाबूराव धोकटे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, जयेश मोहिते, संजय तडाखे, रवींद्र बडेकर, शिवाजीराव गावडे, डॉ. विलासराव थोरात, संताजीराव थोरात, वैभव थोरात, संतोष पाटील यांच्यासह माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, शिवाजीराव माळी यांनी असंघटित व विस्कळीत समाजाला एकत्र आणून वेगळी ओळख करून देण्याचे कम केले. कुठेही आक्रोश, आवाज न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून संघटन केले. कामाची कोणतीही मर्यादा न ठेवता वेगळी भूमिका घेवून हा संघ पुढे निघाला आहे.
ते म्हणाले, सरकार नोकर भरती करत नाही. त्यामुळे सर्वच समाजाने याबाबत प्रबोधन करावे. हा धागा घेवून माळी महासंघ राज्यात काम करत आहे. समाजाने एकत्रित ताकदीचा वापर संघटित विकासासाठी करावा.
पुढे आ. चव्हाण म्हणाले, आरक्षण देताना मूलभूत विचार करण्याची गरज आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दुसऱ्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण दिले. मराठा समाजातील भूमिहीन, अल्पभूधारक लोकांना समोर ठेवून जुलै २०१४ मध्ये आरक्षण दिले. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले. पण या आरक्षणाला त्यानंतरच्या सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी डावलले. सरकारी नोकऱ्या टाळण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. सात हजार जिल्हा परिषद शाळा सरकार खाजगी संस्थांना चालवायला देणार आहे. ही वस्तुस्थिती जाणून दुसऱ्याकडे पदर पसरायची गरज नाही. यासाठी प्रबोधन करा. चांगले शिक्षण घेवून चांगल्या रोजगाराकडे वळा.
समाजाच्या संघटित विकासासाठी या ताकदीचा वापर करा. शारीरिक परिश्रम करण्यापेक्षा समाजाच्या एकत्रित ताकदीचा वापर अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी करा, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भानुदास माळी म्हणाले, माळी समाजाचे वेगळे संघटन करण्याची प्रक्रिया सुरू केली. बघता - बघता मोठ्या प्रमाणात राज्यातील समाज एकत्र आला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकायची. ती मुले मोठे होण्यासाठी पाठबळ दिले जाते. गेल्यावर्षी अधिवेशन घेवून महासंघाची भूमिका पटवून दिली.
विजय माळी यांचे भाषण झाले. संजय माळी, रोहित माळी, अनिल माळी यांनी स्वागत केले. महासंघाचे प्रदेश सचिव प्रवीण जांभळे यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले
No comments:
Post a Comment