Wednesday, September 27, 2023

आज कराडच्या प्रीतिसंगमावर गणेशभक्तांसाठी मिळणार मोफत जेवण ; शिंदे गटाचे युवा नेते रणजितनाना पाटील यांचा सलग नवव्या वर्षी उपक्रम ;

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने सलग नवव्या वर्षी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी प्रीतिसंगमावर येणाऱया भाविक व सार्वजनिक मंडळांना श्रमपरिहार (महाप्रसाद) देण्यात येणार आहे. गुरूवारी 28 रोजी सकाळपासून रात्री शेवटचे गणेश विसर्जन होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. भाविक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रणजितनाना पाटील यांनी केले आहे.

अनंत चतुर्दशीला शहर व परिसरातील भाविक व सार्वजनिक मंडळे प्रामुख्याने प्रीतिसंगमावर कृष्णा नदीत गणेश विसर्जन करतात. विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. या भाविकांना व कार्यकर्त्यांना श्रमपरिहार म्हणून महाप्रसाद देण्याचा उपक्रम रणजितनाना पाटील यांनी 2015 साली सुरू केला. कृष्णा घाटावर हा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. गेल्या वर्षी सुमारे 40 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाबरोबरच भाविकांना पाणी बॉटलही देण्यात येते.  

यावर्षी गुरूवारी 28 रोजी अनंत चतुर्दशी असून कृष्णा घाटावर येणाऱया सर्व भाविकांना महाप्रसाद व पाणी बॉटल देण्यात येणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार आदींना या उपक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. भाविक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रणजितनाना पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment