Friday, September 22, 2023

डॉ अतुल भोसले म्हणाले...नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेले : कराड दक्षिणमध्ये भाजपाच्यावतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ ;

वेध माझा ऑनलाइन।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. अगदी परवाच त्यांनी या देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्याचे ऐतिहासिक काम केले. पंतप्रधान मोदीजी हे सर्वार्थाने जनसामान्यांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड दक्षिणमध्ये भाजपाच्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाच्या निमित्ताने आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत कराड दक्षिणमध्ये आज ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात आली. दुशेरे (ता. कराड) येथील हुतात्मा स्मारक येथे भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ही ‘अमृत कलश यात्रा’ दुशेरे, कोडोली, कार्वे, कोळेवाडी, कोळे याठिकाणी नेण्यात आली. यामध्ये ठिकठिकाणी अमृत कलशांमध्ये मूठभर माती गोळा करण्यात आली. हे कलश दिल्ली येथे अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार असून, अनेक कलशांमधून आणलेली माती वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार असल्याचे डॉ. भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

डॉ. अतुल भोसले पुढे म्हणाले, आपल्या भूमीतील अनेक शूरवीरांनी ब्रिटिशांच्या विरोधात छातीठोकपणे उभे राहत त्यांना सळो की पळो करुन सोडले. या शूरवीरांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून, मोदीजींनी महिला आरक्षण, ३७० कलम हटविणे, उज्वला गॅस योजना, एन.आर.सी., संरक्षण व्यवस्थेचे मजबुतीकरण असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मोदी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, गेल्या ७० वर्षात कुठल्याही सरकारला जे करता आले नाही, असे ऐतिहासिक लोककल्याणकारी निर्णय घेण्याचे धारिष्टय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत मोदीजींचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी, तसेच कराड दक्षिणेतून अतुलबाबांना आमदार म्हणून निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मजबूत संघटन उभारावे. 

या अमृत कलश यात्रेचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, सयाजी यादव, निवासराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, दुशेरेचे सरपंच आनंदा गायकवाड, उपसरपंच हणमंत जाधव, कार्वेचे सरपंच संदीप भांबुरे, उपसरपंच रोहित जाधव, मनिषा जाधव, बाजीराव जाधव, प्रमोद शिंदे, शिवाजीराव जाधव, भास्कर जाधव, सुभाष जाधव, प्रा. जयवंत माने, बाळासाहेब जगताप, हरिहर जगताप, सचिन जगताप, सर्जेराव जगताप, रमेश जगताप, संपतराव थोरात, कैलास जाधव, वैभव थोरात, अशोक सोमदे, प्रदीप जाधव, धनाजी माने, हिंदुराव थोरात, राहुल चव्हाण, पांडुरंग सावंत, अस्लम देसाई, अशोक कांबळे, संदीप फिरंगे, अमृत नेमाणे, हंबीरराव जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment