Friday, September 15, 2023

पुसेसावळीचे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले !

वेध माझा ऑनलाइन। सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून झालेल्या दंगलीनंतर विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर काल गुरुवारपासून पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली.

गणेशोत्सवास अवघे चार दिवस उरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

पुसेसावळीबरोबरच जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त तैनात करत प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच शांतता पूर्वक राहण्याचे आवाहन केले त्यास पुसेसावळीकरांनी प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.


No comments:

Post a Comment