वेध माझा ऑनलाइन। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने 10 सप्टेंबर रोजी जाळपोळ झाल्याची घटना घडली. या गावातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुसेसावळी गावाचा दौरा केला. यावेळी त्यांनी हिंसाचारात मृत झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे पुसेसावळी या गावातील एका समूहाने धार्मिक स्थळावर हल्ला चढवला आणि यात एकाचा बळी गेला. या घटनेनंतर सर्वात अगोदर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळी येथे जाऊन तेथील दोन्ही समाज बांधवाशी चर्चा करीत मृत कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या गावात दोन्ही समूहातील लोकांची गाठ भेट घेतली. गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शांततेबाबत त्यांनी आवाहन केले.
यावेळी अजित पवारांनी दंगलीत मयत झालेले नुर हसन लियाकत शेख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर स्थानिकांशी चर्चा करताना अजित पवारांनी म्हटले की, या प्रकरणात मी लक्ष घालणार आहे. दोषींवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अनेक लोक पिढ्यानपिढ्या एकत्रिपणे गावात राहत आहेत...कधीही दंगल झाली नाही.. आता पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या असेही आवाहन अजित पवारांनी केले.
No comments:
Post a Comment