Thursday, September 28, 2023

एमआयडीसी घेणार ५ विमानतळांचा ताबा, अजित पवारांनी दिले निर्देश ;

वेध माझा ऑनलाइन। एमआयडीसीने राज्यातील पाच विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्टीवर चालवण्यास दिली होती. खासगी कंपनीकडून या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे काहीही न झाल्याने ही पाचही विमानतळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजेच एमआयडीसीने ताब्यात घ्यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. रखडलेल्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती विमानतळांची कामे मार्गी लावण्यात यावीत, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. खासगी कंपनीने या पाचही विमानतळांचे आधुनिकीकरण करून तेथे विमानसेवा सुरू करावी, यासाठी एमआयडीसीने ही विमानतळे खासगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवायला दिली होती.

काही वर्षांपूर्वी एमआयडीसीने नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि बारामती या विमानतळांवर पायाभूत सुविधांची उभारणी सुरू केली होती. या प्रक्रियेला वेग देण्यासाठी तसेच या पाचही विमानतळांचे सक्षमीकरण करतानाच तेथे हवाई सेवा सुरू करण्यासाठी या पाच विमानतळांचे २००९ मध्ये खासगी कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ वर्षांनंतरही या विमानतळांवर विमानसेवा सुरु होऊ शकली नाही. एवढेच नाही तर या विमानतळांची अवस्थाही दयनीय  झाली आहे. हे एकप्रकारे अपयश आहे. म्हणूनच या पाचही विमानतळांचा ताबा एमआयडीसीने घ्यावा, त्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

एमआयडीसीने विकसित केलेल्या विमानतळांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. राज्यातील वाहतूक व्यवस्थेचा विकास करतानाच छोट्या शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. महानगरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित भागात विमानसेवा सुरू झाली पाहिजे. विमानतळासाठी जागा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी पायाभूत सोयीसुविधा उभारल्या पाहिजेत. काही ठिकाणी विमानसेवा सुरू आहेत, त्यांच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. काही विमानतळांवर धावपट्ट्या वाढवल्या पाहिजेत, तर काही ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणे गरजेची आहे, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.



No comments:

Post a Comment