Wednesday, September 20, 2023

आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी ; विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार ! ;

वेध माझा ऑनलाइन।  आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार आहेत. शिंदे  आणि ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार आहे. विधिमंडळ सचिवालयातील सूत्रांनी एका वृत्त वाहिनीला ही माहिती दिली आहे. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष लवकरच नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक-दोन आठवड्यात मांडण्याबाबत या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
 
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे निर्देश दिले होते. काल (बुधवारी) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिवसभरात कायदेतज्ज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यानंतर दोन्ही गटाच्या प्रमुखांना नोटीसा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरुन एकंदरीत आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या कामाला गती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 
 दरम्यान, आमदार अपात्र याचिकांवरील सुनावणीला विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती. यासंदर्भात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच, याचिकेवर 3 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहितीही सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे.

No comments:

Post a Comment