Monday, August 5, 2024

ना. नरेंद्र पाटील यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर.मराठा उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील : ना. नरेंद्र पाटील; कराड येथे सत्कार व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा मेळावा

वेध माझा ऑनलाइन ।
नव्याने व्यवसाय करणाऱ्या मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्यांना पाठबळ दिले पाहिजे‌ या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो. व्यवसाय करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करणे गरजेचे आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचे प्रशिक्षण घेऊन ज्ञान घेतले पाहिजे. आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन यशस्वी झालेल्या उद्योजकांच्या यशामध्ये बँकांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यातही मराठा समाजाचे जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल आयोजित सत्कार व उद्योजकांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम होते. यावेळी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, वसंतराव चव्हाण, राजेश पवार, नामदेव थोरात, रोहित पाटील, भगवानराव जाधव, विजय मुठेकर आदी उपस्थित होते.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, मला सत्काराची हौस नाही. शून्यापासून सुरुवात करून ज्यांनी उद्योग मोठे केले आहेत. त्यांचाही सत्कार झाला पाहिजे. खडतर परिस्थितीतून वाटचाल करत उद्योग व्यवसाय मोठे करणारे लोक इतरांसाठी प्रेरणादायी असतात. ज्या ठिकाणी संघर्ष आहे, तेथे आम्ही उभा असतो. संघर्षाच्या माध्यमातून काही लोकांचे हित साध्य होत असेल, काही लोकांची प्रगती होत असेल किंवा काहींना न्याय मिळत असेल तर तो संघर्ष आम्हाला फार आवडतो. सामान्य परिवारातून जो महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतो, अशा लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य दिले पाहिजे. शून्यापासून व्यवसायास सुरुवात करून त्यामध्ये यश मिळाले असेल तर तो आनंद खरा व मोठा असतो. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. नव्याने व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यांना पाठबळ दिले पाहिजे, हा आमचा मुख्य हेतू आहे. एखाद्याने कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड वेळेवर करावी. महामंडळाच्या माध्यमातून एक लाख लोकांनी व्यवसाय करून इतरांना रोजगार निर्मिती करून दिली आहे. त्याच पद्धतीने यापुढेही मराठा युवकांनी पुढे येऊन व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बँकांचे घेतलेले कर्ज थकीत न ठेवता त्याची वेळेवर परतफेड केली पाहिजे. मराठा समाज बँकांची कर्जे वेळेवर फेडतो असा मेसेज देशभर गेला पाहिजे. महामंडळाच्या माध्यमातून को-ऑपरेटिव्ह बँकांना ताकद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुभाष एरम म्हणाले, शताब्दी हाॅल निर्माण करण्याचा उद्देश आज खऱ्या अर्थाने सफल झाला आहे. महामंडळाच्या माध्यमातून आणखी उद्योजक निर्माण होतील. मराठी उद्योगांच्या यशामध्ये सरकारी व सहकारी बॅंकांचे योगदान आहे. महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला आर्थिक शिस्त लागेल. कराड अर्बन बँकेने राज्याभर उद्योजक उभे केले. सहकारी बॅंका सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी आहेत. 
यावेळी सीए दिलीप गुरव, रोहित पाटील, भगवानराव जाधव, वसंतराव चव्हाण, राजेश पवार, रोहिणी पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक उदय थोरात यांनी केले. सुत्रसंचलन करून मानपत्राचे वाचन विकास पाटील यांनी केले. आभार हणमंतराव पाटील यांनी मांडले.

No comments:

Post a Comment