वेध माझा ऑनलाइन । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडेतील टोलनाक्यावर आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी पावणेतीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना 100 टक्के टोल माफी करण्यात आली असून तासवडे टोलनाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना 25 टक्के टोल माफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी 25 टक्के टोल माफी मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासवडे टोलनाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनास आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोल नाक्यावर सुमारे साडेपाच तास आंदोलन करत वाहने विना टोलची सोडून देण्यात आली.
20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल सवलत
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी दहा वाजल्यापासून तासवडे टोल नाका परिसरात स्वतः ठाण मांडून साडेपाच तास आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत तोल माफीचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन केले. यावेळी महामार्ग प्राधिकरणाकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लेखी आश्वासन देण्यात आले आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कराड तालुक्यातील उंडाळे विभागातील गावे वगळता अन्य 20 किलोमीटर अंतरातील सर्व गावांना फायदा झाला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील काही गावांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे. 20 किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना टोल नाक्यावरून पास काढावे लागणार आहेत.
No comments:
Post a Comment