वेध माझा ऑनलाइन - राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिली.
No comments:
Post a Comment