Sunday, August 14, 2022

काँग्रेस - राष्ट्रवादीची दुय्यम खाती मुख्यमंत्री शिंदेंकडे ; आदित्य ठाकरेंची खाती भाजप ने पळवली ; फडणवीस यांच्याकडे तब्बल 7 खाती...

वेध माझा ऑनलाइन - खूप प्रतीक्षेनंतर राज्यात अखेर शिंदे सरकारकडून खाते वाटप जाहीर करण्यात आली आहेत. अर्थातच खाते वाटपात फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा राहिला असून त्यांच्याकडे तब्बल 7 खाती आहेत. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची दुय्यम खाती मुख्यमंत्री शिंदे यांच्या पदरात पडली आहेत. आदित्य ठाकरेंची खातीही भाजपनं पळवली आहेत. 

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्यांमध्ये शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली होती. उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे.
दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडे अनपेक्षित दादा भुसे यांच्याकडील कृषी खातं देण्यात आलं आहे. दादा भुसेंकडे बंदरे व खनिकर्म देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग त्यांच्याकडे आहेत. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला असला, तरी त्यांनी काम पाहिलेलं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्याता आली आहे. महाविकास आघाडीसरकारमध्ये हसन मुश्रीफांनी कारभार पाहिलेल्या ग्रामविकास खात्याचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे. सांगलीच्या सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खाते देण्यात आले आहे. 



No comments:

Post a Comment