वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणून दाखवल्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीमध्ये वजन वाढले आहे. फडणवीस यांच्यावर आता भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र वगळण्यात आले आहे. सलग दुसऱ्या यादीतून गडकरींचं नाव वगळण्यात आल्यामुळे गडकरींचा पत्ता कट झाला आहे.
भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील मुख्य भाजपच्या नेत्यांची नाव आहे. या यादीत देवेंद्र फडणवीस यांचंही नाव आलं आहे. भाजपने आता फडणवीस यांच्यावर एकाप्रकारे मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सर्वात मोठी घडामोड आहे. दिल्लीमध्ये आता फडणवीस यांचा दबदबा आणखी वाढला आहे.
याआधीही एक यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या यादीमध्ये सुद्धा नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. तसंच, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी संसदीय बोर्डाची नव्याने घोषणा केली आहे. या बोर्डाला पक्षाबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असतात. त्या बोर्डातून नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाव वगळण्यात आलं आहे. या समितीत आता एकही मराठी माणूस नाही. भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणूकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे, भाजपमध्ये 75 वर्ष वय असलेल्या नेत्यांना मोठी पद दिली जात नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक समितीमधून गडकरी यांना वगळण्यात आलं आहे. निवडणूक समिती ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी कोणती असावी, कुणाला संधी दिली पाहिजे, याबद्दल शिफारस करत असते. आता फडणवीस यांची वर्णी लागल्यामुळे दिल्लीमध्ये वजन वाढलं आहे. एकाप्रकारे भाजपने फडणवीस यांच्यावर विश्वास टाकला आहे.
विशेष म्हणजे, राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यामुळे केंद्रातली भाजपचे नेते फडणवीसांवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता फडणवीस यांच्यावर नवी जबाबदारी सोपवून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भाजपच्या संसदीय समितीतील नावं
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
अमित शाह
बी. एस. येदयुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के. लक्ष्मण
इकबाल सिंह लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जटिया
बी एल संतोष (सचिव)
केंद्रीय निवडणूक समितीच्या १५ सदस्यांची नावे
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
अमित शाह
बी. एस. येदयुरप्पा
सर्बानंद सोनोवाल
के. लक्ष्मण
इकबाल सिंह लालपुरा
सुधा यादव
सत्यनारायण जटिया
भूपेन्द्र यादव
देवेन्द्र फडणवीस
ओम माथुर
बीएल संतोष (सचिव)
वनथी श्रीनिवास
No comments:
Post a Comment