Friday, August 12, 2022

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ; एकनाथ शिंदेगट प्रति शिवसेना भवन बांधणार ! मोठी बातमी...

वेध माझा ऑनलाइन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारे निर्णय आणि वक्तव्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेला सर्वात मोठा झटका देणारा निर्णय एकनाथ शिंदे गटाकडून घेण्यात आला आहे. मुख्य शिवसेनेचं मुंबईच्या दादर येथली छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ भव्य शिवसेना भवन आहे. या शिवसेना भवनावर आपला हक्क न सांगता शिंदे गटाने दादरमध्येच प्रति शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण हे प्रति सेनाभवन नसून मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभरण्यात येणार असल्याची माहिती सरवणकर यांनी दिली आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदे गटाचं दादरमध्ये मुख्य कार्यालय असेल. त्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागामध्ये कार्यालय उभारण्यात येतील, अशी माहिती सरवणकर यांनी दिली. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गट आता दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणार, अशी चर्चा रंगली आहे. शिंदे गटाने दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारणं हे त्यांच्यासाठी सोपं काम असलं तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेल्या सेनाभवनाला जो इतिहास आहे तो इतिहास या नव्या प्रति सेनाभवनाला नसणार हे सत्य नाकारता येणार नाही.

No comments:

Post a Comment