Saturday, August 27, 2022

केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज ; महिला व नवमतदार संवाद मेळाव्यासह बाईक रॅलीचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन -  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने देशातील १४४ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून, यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे रविवार (ता. २८) पासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघात सोमवारी (ता. २९) व मंगळवारी (ता. ३०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली आहे. 

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर व जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांच्या स्वागतासाठी कराड दक्षिण भाजपा सज्ज झाली आहे. 

भाजपा कराड दक्षिणच्यावतीने सोमवारी (ता. २९) सायंकाळी ५ वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला केंद्रीय मंत्री सोम प्रकाश संबोधित करतील. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजता ढेबेवाडी फाटा ते स्व. यशवंतराव चव्हाण निवासस्थान विरंगुळा बंगल्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. १० वाजता वेणुताई चव्हाण सभागृहात नवमतदार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ११ वाजता कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.


No comments:

Post a Comment