Tuesday, August 23, 2022

सत्ता संघर्षाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग ; शिवसेना कोणाची याबाबतही फैसला दोन दिवसांनीच...?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी ५ सदस्यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी आता २५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून यावेळी नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? या मुद्द्यावर आज दुपारी ३ वाजता नियोजित असलेली सुनावणी देखील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

यासंदर्भातील पाच याचिकांचा समावेश सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या त्रिसदस्यीय पीठाच्या मंगळवारच्या दैनंदिन व पुरवणी कार्यसूचीत सोमवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीबाबतही रात्री उशिरापर्यंत अनिश्चितता होती. मात्र, आज सकाळी कपिल सिब्बल यांनी यासंदर्भातील याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी हा विषय कार्यसूचीमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास यावर सुनावणी घेण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना बजावलेल्या आमदारांच्या नोटीसा, शिवसेना नेते सुभाष देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आदी मुद्दय़ांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment