Tuesday, August 23, 2022

भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवारांनी व्यक्त केला संताप ; अनिल देशमुख, नवाब मलिक ,संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर व्यक्त केली नाराजी ; नवाब मलिक यांची काय चूक होती ; पवारांचा सवाल...

वेध माझा ऑनलाइन - सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी, सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन, त्यात विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे होत असलेले प्रयत्न अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जिथे सत्ता नव्हती तिथे आणली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप करत अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. जिथे नव्हती तिथं आणली गेली. महाराष्ट्रातही भाजपची हुकुमत नव्हती, पण शिवसेनेचे आमदार गेल्याने भाजपची हुकुमत आल्याची खोचक टीका पवार यांनी केली आहे. शरद पवार दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहित होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. अशा पद्धतीने देशात कारवाया केल्या जात आहेत. देशात सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. 

नवाब मलिक यांची काय चूक होती? 
आज हुकुमत त्यांच्या हातात आहे. जो राजकीय पक्ष किंवा नेता त्यांच्याविरोधात बोलतो त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते. अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली. त्यांच्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला. नवाब मलिक यांची काय चूक होती? २० वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई होत आहे. चुकीचे काम केले तर आमचे समर्थन नाही. केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर होतोय. ईडी, सीबीआयला सोबत घेऊन सध्या काम केले जात आहे, असा दावाही शरद पवार यांनीही केला. 
दरम्यान, देशातील लोकांमध्ये संभ्रम आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांजवळ आज बहुमत आहे. पण हे उचित बहुमत नाही. देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही, असेही शरद पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment