Monday, August 22, 2022

आता काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार ? हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सभागृहात गैरहजर होते...

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदे  यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता अन्य पक्षातूनही शिंदे गटात येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता काँग्रेसमधील एक माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे शिंदे गटातील कृषितमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट.

अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी बंद दाराआड झालेली बैठक सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय वर्तुळात या बैठकीचे अनेक अर्थही काढले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारच्या आढावा बैठकीला आल्यानंतर अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. विशेष म्हणजे यावेळी कुणालाच आत येऊ दिले नाही
दरम्यान, याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. यांना संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली असे त्यांनी सांगितले. 

अशोक चव्हाण नाराज?
ही भेट शिष्टाचाराचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीही ते सभागृहात गैरहजर होते. दरम्यान, अलीकडेच अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीनंतर अस्लम शेख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव समोर येत होते. हे दोन्ही नेते काँग्रेस सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ शकतात, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment