Wednesday, August 17, 2022

विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर संशयाचे ढग वाढले ! त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा, बरंच काही बाहेर येईल,; मेटेंचा ड्रायव्हर समाधान वाघमारे यांचा दावा...

वेध माझा ऑनलाईन - शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मात्र काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेटेंच्या अपघातापूर्वी 3 ऑगस्टला पुणे एक्स्प्रेसवर शिक्रापूरजवळ एका गाडीने पाठलाग केला होता. आता त्यांचा ड्रायव्हर समाधान वाघमारे याने शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, असं वक्तव्य केलं आहे.

विनायक मेटेंच्या यांच्या अकाली निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहे. मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी काही आरोप केले आहे, त्यामुळे मेटे यांचा अपघात आहे की घातपात याची चर्चा रंगली आहे. तर आता मेटेंचा चालक समाधान वाघमारे यांनी वेगळाच खुलासा केला आहे.'पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात रस्त्यावर असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासा, त्यामधून बरंच काही बाहेर येईल. अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली आहे. समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र 14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते.
समाधान वाघमारे म्हणाले की, 3 ऑगस्ट दिवशी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. आमची गाडी ही 80 च्या स्पीडने चालली होती. पण त्या गाडीने जवळपास 120 किमीच्या वेगाने कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का? मात्र साहेब म्हणाले, ते पिलेले असतील त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त 80 च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता.जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर मी स्वतःचा जीव दिला असता, मात्र साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं. शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं, असा दावा समाधान वाघमारे यांनी केला आहे.
मी सुट्टीवर होतो, मी असतो तर हा अपघात झालाच नसता. मी दीड-दीड हजार किलोमीटर गाडी चालवायचो. पण कधीही झोपलो नाही. झोप आली तर तसं सांगायचो. मी सीट बेल्ट नेहमी वापरतो. 2007 पासून मी मुंबईत गाडी चालवत होतो. गाडीचा अपघात झाला, त्यावेळी दोनच एअरबॅग बाहेर निघाल्या आहेत, पाठीमागच्या एअरबॅग तर उघडल्या का नाही, याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे, असंही वाघमारे म्हणाले.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण लागलं आहे. त्यामुळे नवनवीन खुलासे आणि माहिती समोर येत असल्याने संशयाचे ढग अधिकच दाट होत असल्याचा चित्र, निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment