वेध माझा ऑनलाइन।आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली, आरक्षण टप्प्यात आलं असं दिसत असताना अचानक ते मिळत नाही अंस अनेकदा झालं, या सगळ्यांचा अभ्यास केला आणि अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलं, आता 32 लाख नोंदी सापडल्यानं ते यशस्वी होताना दिसत आहे असं मनोज जरांगे म्हणाले. कुणबीच्या नोंदी सापडत असताना आता मराठा आणि कुणबी वेगळे कसे काय असू शकतात असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे कसे काय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग केला तर ते आरक्षण टिकणार नाही. गेल्या वेळी ईएसबीसी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच दिलेलं आरक्षण टिकेल. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, आता नोंदीही सापडत आहेत, मग आरक्षण द्यायला काय अडचण आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीस चाळीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, पण प्रत्येकवेळी आरक्षण टप्प्यात दिसतं आणि जवळ आलं की हुकतं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंतची आंदोलनं ही का फुटली आणि बंद झाली याचा अभ्यास केला. त्यानंतर आता आंदोलन केलं आणि हे आतापर्यंत 80 टक्के यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे 32 लाख घरांमध्ये याचा फायदा झाला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मानतो. या आधी 1967 नंतरच्या नोंदी घेतल्या जायच्या, आता 1805 पासूनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आता 24 डिसेंबर रोजी सरसकट आरक्षण घेणार.
आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष गेलं. पण जर हा लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी आरक्षण घ्यायचं, आंदोलन सोडायचं नाही. 123 गावांचा त्यामध्ये सहभाग होता.
स्वतंःला गरीब म्हणवता आणि जेसीबीमधून फुलांची उधळण केली जाते असा जरांगेवर आरोप केला जातोय. त्यावर जरांगे म्हणाले की, फुलं आमची आहेत, त्यांच्या का पोटात दुखतंय. आजकाल एखाद्या आमदाराने खांद्यावर हात ठेवलं तरी पोरगं दुसऱ्या दिवशी कुणाशी धड बोलत नाही असं म्हणत जरांगे म्हणाले की, आंदोलन हे समाजासाठी आहे, समाजासोबत गद्दारी नाही. त्यामुळे काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं ठरवलं आहे.
No comments:
Post a Comment