वेध माझा ऑनलाइन। येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. पण त्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या प्रकल्पग्रस्तांना सेवेत कायम करावे, यासाठी त्यांच्या शिष्टमंडळासमवेत लवकरच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात मुंढे येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपली कैफीयत डॉ. भोसले यांच्यासमोर मांडली. मुंढे येथील महापारेषणच्या प्रकल्पासाठी येथील नागरिकांच्या जमिनींचे ४ वेळा अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार २०१६ साली ३५ जणांना नोकरीत घेण्यात आले. प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली ७ वर्षे नोकरीत कायमच करण्यात आलेले नाही. याप्रश्नी शासन दरबारी वेळोवेळी प्रयत्न करुनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे याप्रश्नी डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन, शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या प्रकल्पग्रस्तांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी केली.
यावेळी डॉ. भोसले यांनी मुंढे येथील प्रकल्पग्रस्तांसोबत ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत, नोकरीत असलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून सेवेत कायम करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मुंढे गावचे उपसरपंच सागर पाटील, राहुल साळवे, राहुल जमाले, प्रदीप चव्हाण, रोहित यादव यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment