Saturday, November 11, 2023

मराठ्यांचे वाटोळे करणारे ‘ते’ कोण? २४ डिसेंबरला जरांगे-पाटील नावे जाहीर करणार ;

वेध माझा ऑनलाइन । मराठा आरक्षणावरून आता मनोज जरांगे-पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यापूर्वी जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ हे दोघेही ओबीसी नेते आहेत. त्यामुळे मराठाआरक्षणावरून मराठा नेते आणि ओबीसी नेते यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आता जरांगे-पाटील यांनी थेट विजय वडेट्टीवारांना आव्हान दिले आहे. येत्या २४ डिसेंबरला अशा सहा नेत्यांची नावे सांगतो ज्यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे, असा इशारा जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. त्यामुळे सरकारविरोधात असलेल्या मराठा आंदोलनाचा मार्ग बदलणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते.

तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुम्ही कुणासाठी काम करता हे कळले असून तुमच्या सारख्याच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, असे सुनावत जरांगे-पाटील यांनी ‘तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे आणि मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात’ अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे.

काही दिवसांपूर्वी जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणावरून जोरदार वाद झाला होता. तो वाद अजून शमलेला नसताना आता जरांगे-पाटील विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष सुरू झाला आहे. तुम्हाला मराठा समाजाविषयी माया नाही. काय करायचे हे आम्हाला तुम्ही सांगू नका. अभ्यास करायचा की नाही हे आमच्या मुलांना तुम्ही सांगायची गरज नाही. तुमच्यासारख्या लोकांनीच आम्हाला संपवलं आहे, असा घणाघाती वार जरांगे-पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला आहे. शिवाय असं काहीतरी फालतू बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात, असा आरोपही त्यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला आहे.

No comments:

Post a Comment