वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, विजयाचा क्षण जवळ येत असताना आमचे फलक फाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱया ‘त्या’ मंत्र्याला सरकारने वेळीच रोखावे, अन्यथा सरकारला जड जाईल, असा गंभीर इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला.
नगर जिल्हा दौऱयावर आलेले मनोज जरांगे-पाटील यांची बुधवारी रात्री संगमनेर येथे, तर आज नेवासा आणि शेवगाव येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात बोलणाऱया आणि जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱयांवर जोरदार हल्लाबोल केला. नेवासा येथील सभेत ऍड. कारभारी वाखुरे यांनी मराठा आरक्षणास विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या निषेधाचा ठराव मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
जरांगे पाटील म्हणाले, ‘आत्तापर्यंत मराठय़ांना आरक्षण समजू दिले नाही. 70 वर्षांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर त्याचा मोठा फायदा समाजाला झाला असता, मराठा समाजाची मुले आयएएस, आयपीएससारख्या मोठय़ा पदांवर गेले असते. त्यांना घरी बसावे लागले नसते. मात्र, जाणून-बुजून समाजाला आरक्षण दिले गेले नाही. 70 वर्षे षड्यंत्र रचले गेले. पुरावे बुडाखाली दाबून ठेवले गेले. पुरावे नाही म्हणणारे हे नेते कोण, हे समजायला हवे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर आता सरकारमध्ये हालचाली सुरू झाल्या. सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला गेला; मात्र आरक्षण दिले गेले नाही.’
आत्तापर्यंत तीन वेळा मराठा समाज आरक्षणापासून हुकला. 1805 पासूनच्या नोंदी सापडल्या आहे, तरी आरक्षण दिले गेले नाही. ओबीसीसह इतर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कधीही मराठा समाजाने विरोध केला नाही. मात्र, आता आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर विरोध होताना दिसत आहे. मराठय़ांनी 70 वर्षांत अनेक पक्ष मोठे केले, आपले नेते मोठे केले. गरज पडेल, तेव्हा ते मदत करतील असे वाटत होते. मात्र, आज मराठा समाजाच्या मागे कोणीही उभा राहिला नाही, अशी खंत व्यक्त केली.
मराठा समाजाची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात येत असताना, राजकीय शक्तीने षडयंत्र रचून ती लढाई अयशस्वी केलेली आहे. आता सरकारने 24 डिसेंबरपर्यंत शब्द दिलेला असताना फलक फाडणारे, आरक्षणास विरोध करणारे मराठा समाजाला उचकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जातीय तेढ निर्माण करीत असून, त्यांनी चिल्लर चाळे बंद करावेत. सरकारने त्या मंत्र्याला वेळीच न आवरल्यास सरकारला जड जाऊ शकते, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, 1 डिसेंबरपासून पुन्हा जोमाने साखळी उपोषणे सुरू करा. माझा जीव गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. तुम्ही एकजूट राखा, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment