Wednesday, November 29, 2023

समलैंगिक संबंधात खंड पडल्याने महाविद्यालयीन तरुणाची निर्घृण हत्या

वेध माझा ऑनलाइन। विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलैंगिक संबंधात खंड पडल्याने एका महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.वाघोली परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. महेश साधू डोके (वय 21 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेश वाल्हेबोलाई, (ता.हवेली) येथील रहिवासी होता. ओळखीतील तरुणाने महेशची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश डोके हा वाघोली येथील बीजीएस महाविद्यालयात बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता तो होस्टेलमध्ये राहत होता. महेश मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास महाविद्यालयातून होस्टेलच्या दिशेने जात होता. बकोरी मार्गावर एका तरुणाने महेशच्या डोक्यावर आणि गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि पसार झाला. रक्तभंबाळ अवस्थेत स्थानिक तरुणांनी महेशला जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वाटेतच महेशची प्राणज्योत मालवली.

मित्रासोबत समलिंगी संबंध
महेश आणि त्याचा मित्र सागर गायकवाड यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. सागर गायकवाड हा कंत्राटदार असल्याचे समजते. परंतु महेश याने आरोपीसोबत संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी संतापला होता. समलिंगी संबंधांत खंड पडल्याने आरोपी मित्राने महेशवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. आरोपी सध्या फरार आहे.

कृष्णकांत कमलेशकुमार यादव याने दिलेल्या तक्रारीवरून सागर गायकवाड याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांत निर्घृण हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गायकवाड फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. लोणीकंद पोलिस पुढील तपास करत आहेत

No comments:

Post a Comment