Monday, November 6, 2023

होय...रेठरे बुद्रुक अतुल भोसलेंचच...!

वेध माझा ऑनलाईन। कराड तालुक्यात महत्वपूर्ण ठरलेल्या रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक कृष्णा विकास आघाडीने सरपंचपदासह सर्वच १८ जागांवर घवघवीत यश मिळवून, विरोधकांना आसमान दाखविले. विजयी उमेदवारांनी विजयाचा जल्लोष साजरा करत, कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन आशीर्वाद घेतले.

रेठरे बुद्रुक गावात यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी डॉ. अतुल भोसले समर्थक आणि आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटात सामना रंगला होता. पण सत्ताधारी भोसले समर्थक कृष्णा विकास आघाडीने अर्ज माघारीच्या दिवशीच ७ जागांवर बिनविरोध विजय संपादन करत, विरोधी आ. पृथ्वीराज चव्हाण गटावर सरशी केली होती. सरपंचपदासह ११ जागांसाठी रविवारी (ता. ५) मतदान पार पडले. 

आज जाहीर झालेल्या निकालात कृष्णा विकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी यांनी ४,२३२ मते मिळवित विजय संपादन केला. तसेच कृष्णा विकास आघाडीच्या उमेदवार काजल दत्तात्रय आवळे (१०९७), सविता गणपतराव पाटील (९५३), नवनाथ चिलाप्पा डोईफोडे (८१६), सुहास आनंदा घोडके (७७८), स्वाती जालिंदर फसाले (७७०), तुकारात रघुनाथ पवार (७३९), दत्तात्रय शिवाजीराव मोहिते (११०१), वैशाली प्रदीप कदम (१११९), रेश्मा सागर बनसोडे (१००९) आणि चंद्रकांत कुंडलिक साळुंखे (९६४) यांनी भरघोस मते मिळवित घवघवीत यश प्राप्त केले. दरम्यान, यापूर्वीच कृष्णा विकास आघाडीचे शरद नामदेव धर्मे, रुक्साना गुलाब मुल्ला, संग्राम दिलीप पवार, संगीता शिवाजी सावंत, सचिन अरुण जाधव, शर्मिला संतोष मोहिते व भाग्यश्री रोहित पवार असे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या ३५ वर्षांत इतक्या जागा एकाचवेळी बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ समजली जाते. 

सरपंचपदासह सर्वच १८ जागांवर सत्ताधारी कृष्णा विकास आघाडीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. विजयी निकाल घोषित झाल्यानंतर कृष्णा विकास आघाडीच्या उमेदवारांनी कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन, आशीर्वाद घेतले. तसेच विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.

No comments:

Post a Comment