वेध माझा ऑनलाईन। पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं पार पडलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान सिकंदर शेखने किताब पटकावला. अंतिम सामन्यात सिकंदरने गत महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या तीस सेकंदात अस्मान दाखवत चांदीची गदा पटकावली.
गेल्या वर्षी शिवराज राक्षेने सिकंदर शेखचा अंतिम सामन्यात पराभव केला होता. पण यावेळी सिकंदरने बाजी मारली. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे हे दोन बलाढ्य पैलवान पुन्हा आमने सामने येणार असल्याने कु्स्तीप्रेमींची उत्सुकता वाढली होती. पुण्याच्या फुलगावमध्ये कुस्तीप्रेमींची तुफान गर्दी झाली होती. ही लढत चुरशीची होणार असं वाटत असतानाच अवघ्या तीस सेकंदात सिकंदरने शिवराजला चीतपट केलं.
माती विभागात सिकंदर शेखने संदीप मोटे याचा 10-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर गादी विभागात शिवराज राक्षेने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली. शिवराजने उपान्त्यफेरीत माऊली कोकाटेचा 13-2 असा सहज पराभव केला होता. गेल्या वेळी पराभूत होऊनही सिकंदर शेख हिरो ठरला होता. यावेळी त्याने जेतेपदाची कसर भरून काढली.
सिकंदर शेख बद्दल थोडक्यात...
महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला. सिकंदरचे वडिलही कुस्तीपटू होते, पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हमालीचं काम करावं लागलं. पण वडिलांची इच्छा सिकंदरने पूर्ण केली. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या सिकंदरने प्रचंड मेहनत घेत मोठा पैलवान बनण्याची वडिलांची इच्छा पूर्ण केली. सिकंदर शेख नुकताच भारतीय लष्करात सहभागी झाला असून तो सैन्यदलाकडूनही खेळतो.
सिकंदरने देशभरात अनेक मैदानं मारली आहेत. यात त्याने अनेक बक्षीसंह पटकवालीत. या एक महिन्द्रा थार, एक ट्रॅक्टर, 4 ऑल्टो कार, 24 बुलेट, 6 टीव्हीएस, 6 स्लेंडर तर 40 चांदीच्या गदा आणि सुवर्ण पदकं त्याच्या खात्यात जमा आहेत.
No comments:
Post a Comment