वेध माझा ऑनलाईन। दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच राडा झाला. पोलिसांसमोर दोन्ही गटांमध्ये वाद रंगला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“ही एक दुर्दैवी घटना आहे, कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरले आहेत जे बाप चोरत पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेले त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आधी त्यांचा फोटो वापरुन, आमचा पक्ष वापरून, नाव वापरुन स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांचे प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. नवी मुंबई मेट्रो सुरु झालेली नाही. डिलायल रस्ता सुरु झालेला नाही, बिल्डर पालकमंत्र्यांकडे वेळ नसावा. जनतेकडे लक्ष द्यायचं नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर दंगली घडवायच्या, वातावरण बिघडवायचं, उद्योग गुजरातला धाडायचे हे सगळं मिंधे सरकारमध्ये सुरु आहे.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
घोषणा दिल्या त्यात गैर काय?
ज्यांना वाटलं असेल की डरपोक आणि गद्दार लोक येऊ नयेत त्यांनी घोषणा दिल्या असतील त्यात गैर काय? ज्या सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्ती असलेल्या शाखेवर हातोडा मारणं, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेला बॅनर फाडणं या गोष्टी केल्या आहेत त्यांना काय अधिकार आहे स्मृती स्थळावर जाण्याचा अधिकार काय? महाराष्ट्र या सगळ्यांनाच चांगलं उत्तर देणार आहे. निवडणुका लागूदेत त्यांना उत्तर मिळेल. ” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना सुनावलं आहे.
नेमकं काय घडलं?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) ११ वा स्मृतीदिन आहे. त्यामुळे देशभरातील बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) येतात. त्यामुळे शिवतीर्थावर चोख बंदोबस्त ठेवावा लागतो, तसेच शिवसैनिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागतात. या सगळ्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थावर येऊन गेले. त्यापाठोपाठ शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर जमल्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले.
शिवतीर्थावर पोहोचल्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं मोठ्या राड्यात रुपांतर झालं. शिवतीर्थावर शिवसैनिकांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली. शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढू लागल्याने अखेर मुंबई पोलिसांचं एक पथक शिवतीर्थावर दाखल झालं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परबदेखील शिवतीर्थावर दाखल झाले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या मध्यस्थीने नियंत्रणात आणली गेली.
No comments:
Post a Comment